शिव भूपतीस माझा सांगा निरोप जा जा
(चालः या प्रीय भारताचा जीव...)
शिव भूपतीस माझा सांगा निरोप जा जा ॥धृ 0॥
महाराष्ट्र धैर्यशाली करवा पुन्हा विशाली ।
तुमची प्रथा बुडाली या या पुन्हा समाजा ॥१॥
तलवार ती भवानी नेली दुजे लूटोनी ।
अडवावया न कोणी धावोनि घ्या तिला जा ॥२॥
भगवे निशाण तुमचे जाते कि काय गमते ।
बघवे न ते अम्हाते ताटस्थ त्यासि राजा ॥३॥
विरवृत्ति नष्ट झाली भेकाड वृत्ति आली ।
क्षत्रीयता निमाली अति बोलकाचि वाजा ॥४॥
तुकड्या म्हणे ही वाणी कैलास भेदवोनी ।
जागोनि शूलपाणी धाडो तुम्हास काजा ॥५॥