टिकेना मोह कोणाचा, मनी का लोभ हा धरिशी ?

(चालः अगर है ग्यान को पाना...)
टिकेना मोह कोणाचा, मनी का लोभ हा धरिशी ? ।
उगिच पापे करुनिया ही, जिवाला कष्टमय करिशी ।।धृ०।।
किती राजे, महाराजे, होउनी जाति नी येती ।
न कोणी साथ ने काही, तूच का या भ्रमी मरशी ? I।१।।
कांचनाची पुरी शोभे, रत्नमय रावणाची ती ।
ढसळता रीत कर्माची, न उरली कौडि  ही  सरशी ।।२।।
अती लोभे, अती पापे, कंस हा मातला होता।
प्रभू धावोनिया त्याची,   राख   केली    गृहासरसी ॥३॥
अरे ! जे शोभते तेची, करावे जीव-उद्धारा।
सांगतो दास तुकड्या हा, प्रभू स्मर सत्य तू  तरशी ॥४॥