हे दीनदयाळा, रामा ! कामा आला बहुतांच्या तू
हे दिनदयाळा, रामा! कामा आला बहुतांच्या तू ।।धृ०।।
जड शीळा पाहुनी अहिल्या, देसि चरण-रज-प्रेमा।
जागृत करुनी देह तियेचा, नेसि स्वये निज धामा ।।का० ।।१ ।।
ऋषीश्वरांचे रक्षण करण्या, वधसी असुर सुकामा।
स्थळोस्थळी, आश्रमी जाउनी, उध्दरिले घनश्यामा!।।का० ।।२।।
कोळी वाल्मिक पषश्चात्तापे, जपता उलट्या नामा।
शब्दभेद नच काही जाणुनि, देसि तया विश्रामा ।।का० ।।३।।
तव महिमार्णव गाति पुराणे, नेति म्हणुनि अभिरामा !
तुकड्यादास लीन तव चरणी,धरुनि हृदयि तव नामा।।का० ।।४।।