सुदिन हा संत - सेवेचा, सुभाग्ये
(चाल : करा काही कृपा आता...)
सुदिन हा संत - सेवेचा, सुभाग्ये लाभला आम्हा ।
मिळाली दर्शने काशी, निमाली वृत्तिची सीमा ॥धृ०।।
सदा फुलबाग बोधाचा, दिसे फुलला मुखावाटे ।
रंगले ज्ञान - वन सारे, पसरला भृंगमय प्रेमा ॥१॥
निसर्गे शांतिची ज्योती, सदा झळके तया दारी ।
शिपायी कडक वैराग्ये, अखंडित साधिती कामा ॥२॥
स्तुती - निंदा उभ्या भिंती, दिसे बाहेरच्या मार्गी ।
घासती बोचती अंगा, जावया साधुच्या धामा ।।३॥
लीन तुकड्या तया पायी, दर्शने भ्रांतिही जाई ।
जन्म - मृत्यू नसे काही, विसरती भेद - भय नेमा ॥४॥