वाहते किती सौम्य तू, तुज शांतता कोणी दिली ?

(चालः ठेविले पाऊल दारी...)
वाहते किती सौम्य तू, तुज शांतता कोणी दिली ? ।
द्रोह ना तव अंतरी,   गंभीर   वृत्ती   शोभली ॥धृ०॥
कोटियांचे पाप वाहता, शीर ना तुजसी जरा ।
मुक्त करिशी पूर्वजाते, स्वर्गिची जणु   माउली ॥१॥
शुध्द किति तव प्रेम गंगे ! ना कुणासी मागशी।
जगविशी हे विश्व सारे, सोडुनी  झरणे   खुली ॥२॥
भाग्य किति तरी थोर त्यांचे, जे तुझ्या तटि राहती।
ईश्वराच्या पूजना, जणु   तूच   त्यांची   वाटुली ॥३॥
निर्मिली वेली - जुळे, तट साजिरा करवूनिया ।
शालु हा जणु नेसुनी, प्रिय भक्त पाहण्या चालली ।।४॥
दास तुकड्या चिंतितो, तुज भेटण्यासी एकदा ।
उघडूनी पट भेट दे गे !   धन्यता   मज   लाधली ।।५।।