विश्वव्यापी प्रेम शिकण्या, न्याल का मजला कुणी ?

(चालः ठेविले पाऊल दारी...)
विश्वव्यापी प्रेम शिकण्या, न्याल का मजला कुणी ? ।
दाखवा तरि ठाव तो, बहु आवडे  माझ्या   मनी ।।धृo।।
कोणि ना परका दिसो, मज तीनलोकी पाहता ।
द्रोहता ही नष्ट हो, वर द्याल का मजला   कुणी ? ॥१।।
जो दिसे तो अपुलाची, पाहता अणि राहता ।
भेद हा जाई लया, स्थळ    दाखवा   ऐसे   गुणी ॥२॥
धर्म कोणीही असो, वा देश कोणीही असो ।
शुध्द प्रेमा एक होवो,    हो   धनी   या    निर्धनी ॥३॥
दास तुकड्या सांगतो, मज त्याविना नच चैनही ।
भेटवा या पामरा,   जिव   बावरा   झाला   मनी ।।४॥