चला हो ! चला पंढरीला ।
(चालः गडे हो ! कृष्ण गडी अपुला..)
चला हो ! चला पंढरीला ।
विठ्ठल राजा वाट पाहतो, जिवा तारण्याला ।।धृ०॥
कुणीही भाविक जरि गेला ।
शांतवि त्याच्या जिवा,देउनी अमर धाम त्याला ।।१।।
सुखाचे सगुण रूप बनला ।
उभा विटेवरि, कटावरी कर, बघतो दासाला ॥२।।
भीवरेतिरी वास केला ।
भक्त-जनांच्या भक्ति-सुखाने, तिथेच स्थिर झाला ।।३॥
पुंडलिक-सेवा बघण्याला ।
आला ते पासुनी हरी हा, मूळ गाव भुलला ॥४॥
रंगला भाविक भजनाला ।
ज्ञानोबाचे सुरस काव्य हे, आवडले त्याला ॥५।।
पाहनी भक्ती गहिवरला ।
नामासंगे हरी कीर्तनी, देवपणा भुलला ।।६।l
नाचतो थै - थै रंगाला ।
संत तुकाचे प्रेम पाहूनी, राखी शेतीला ।।७।।
जनीच्या वेचत शेणीला ।
गोरोबाची घडवित मडकी, अती हर्ष त्याला ।।८।।
किती सांगू हरिची लीला ?
भक्त-काम-कल्पद्रम भक्तासाठि महार झाला ॥९॥
खजाना नेइ बेदरीला ।
दासासाठी त्या यवनाच्या जात सलामीला ।।१०।।
प्रीय हा एकनाथ त्याला ।
घेउनिया रुप तया घरी वाहतो कावडीला ।।११।।
भक्त चोखोबा प्रिय झाला ।
ओढू लागे ढोर तयासी, नाहि जात याला ।।१२॥
असा हा ठेवा भक्ताला ।
न सांगताची करितो कामे, ठावुक सकलाला ।।१३।।
जवळ हा आहे पंढरीला ।
उठा उठा रे ! चला पहाया या आषाढीला ।।१४।।
मेळ संतांचा बह जमला ।
प्री-धो वाद्ये कर्ण-तुतारी , सैन्यभार आला ।।१५।।
जणू या मृत्यू-लोकाला ।
मुकड्यादास म्हणे वैकुंठचि, ठाव खरा गमला ।।१६।।