करा रे ! कृष्ण गडी अपुला
(चाल : गडे हो ! कृष्णा गडी अपुला...)
करा रे ! कृष्ण गडी अपुला ।
मिटे न मैत्री जन्म-जन्मि ही,देह जरी गळला ।।धृ०।।
फुकाचे नाम जपा त्याचे ।
धन-संपत्तिस वाण न राहे, लक्ष्मि घरी नाचे ॥१।।
लावता चित्त तया पायी ।
अखंड अमृत-झरा जिवाला पावे लवलाही ॥२॥
धरीता ध्यान सगुण त्याचे ।
विश्व ब्रह्म हे,कृष्णचि जिकडे तिकडे जगि भासे ॥३॥
देह अर्पिता तया चरणी ।
वैकुंठाचे राज्य मिळे, करिती जन मनधरणी ।।४॥
जरासे देता अति भेटे ।
तुकड्यादास म्हणे कानी घ्या, लक्षि धरा नेटे ।|५॥