जिवलग गुरुविण कोणि न मनुजा !

(चालः सतत विमल भज नामा...)
जिवलग गुरुविण कोणि न मनुजा !
जग हे स्वार्थ - सुखाचे सगळे, शेवटि साथि न येई मनुजा ! ।।धृ०।।
धनद्रव्यावर नाती टपती, द्रव्य जाय मग झूकूनि न बघती ।
सकळ जगाची ऐसी रीती, हीन-दीना कुणि जाणि न मनुजा ! ।।१।।
देह साजरा तोवरि कांता, रोगि होय मग घेई माथा।
सांग सांग मग कोण अनाथा ? पाजिल तिळभर पाणि न मनुजा ! ।।२।।
दीनाचा एक सद्गुरु दाता, दावुनि बोध देतसे संथा ।
तुकड्यादास म्हणे भ्रम आता, सोडी गुरुविण मानि न मनुजा ! ।।३।।