झणि हासति काय मला जन हे
(चालः आशक मस्त फरकीर हुवा...)
झणि हासति काय मला जन हे, ही लाज मनी तिळमात्र नको llधृ।।
कार्य करा प्रभुला स्मरुनी,निःस्वार्थपणी प्रियता धरुनी ।
मग वानो कुणी निंदोहि कुणी, अभिमान मनी तिळमात्र नको ॥१॥
हे विश्व मकान खरे अपुले, समजोनि करी मग जीव - दया ।
अति क्रूर असूर असेल कुणी, वधण्यासि दया तिळमात्र नको ॥२॥
निर्माण करा प्रभुची प्रभुता, प्रभु देइल मोक्ष ययाचि मता ।
तुकड्या म्हणे काय अरे ! बघता ? घ्या कार्य करी अजि, वेळ नको l।३॥