रमला हरि कुंजवनी सखये !
(चालः आशक मस्त फकीर हुवा...)
रमला हरि कुंजवनी सखये ! हरहर जिवा अति वाटतसे ॥धृ०॥
किति वेळ असा राहील तिथे ? सांगा तरि जाउनिया हरिला ।
कुणि मोहिल काय झणी सगुणा ? अग ! दुःख असे उरि दाटतसे ।।१।।
किति गोड तयाची बंसि सये ! पशुपक्षि-जिवा रमवी विपिनी ।
मनमोहन- बंसि हरील कुणी, मम चित्त कसे होईल पिसे ।।२।।
शिरि मोर-पिसारा सुंदरसा, योगी बघती हृदयात जसा ।
कुणि काढिल काय हळुच असा ? नेत्रातचि ते रुप साठतसे ।|३।l
चल जाउ झणी बघण्या मिळुनी, दहापाच जणी अति एकहुनी ।
तुकड्या म्हणे भाग्य खुलेल गडे, हरिच्या विरहे जिव फाटतसे l।४।l