जगचालक जगदीशा ! ऐकी करुणा

(चालः हे राष्ट्ररूपिणी गंगे...)
जगचालक जगदीशा ! ऐकी करुणा - वाणि परेशा ! ॥धृ0॥
विश्व तुझी रचना ही सारी सुंदर सकल गणेशा ! ।
अलंकारकृति नवी विलसते भिन्न जीवाची ईशा ! ऐकी 0 ॥१॥
मोहविते नयनाला निर्मळ सुरस सरस ही नीशा ।
तेजवितो जगताला भानू जिववी जीव  हमेशा ॥ ऐकी 0 ॥२॥
निसर्ग करितो सुशोभित ज्या त्या देश - विदेशा ।
सकल कला ही तुझिया सत्ते  चालतसे   सर्वेक्षा ! ऐकी0 ॥३॥
तुकड्यादास म्हणे हा निश्चय गाति पुराणि नरेशा ! ।
ऐसे असता भारत - भूची का सोडियली आशा ?॥ऐकी0॥४॥