उघड़ा मंदिर हे देहाचे बघण्या आत तयाचे
(चालः बाळा ! जो जो रे .)
उघड़ा मंदिर हे देहाचे बघण्या आत तयाचे ॥धृ0॥
जळतो दीप सदा जिवनाचा प्रकाश निर्मळ त्याचा ।
नच हा सूर्य - शशी जगतीचा अंत न लाभे त्याचा ॥१॥
वाद्ये गोड किती मधुर गती नाद अनाहत होती ।
अंबर गर्जतसे झणझणती न कळे त्यांची गणती ॥२॥
झरणे वाहतसे चौफेरी इडापिंगळा - धारी ।
झुळझुळ नाद निघे झंकारी सोहं शब्द उच्चारी ॥३॥
बसती देवगण आनंदे आपआपुल्या छंदे I
सिंहासन त्यांचे निर्द्वांदे निर्मल दलिदलि नांदे ॥४॥
सुंदर संघ दिसे वृत्त्यांचा जोडा जीव - शिवाचा ।
चाले वाद सदा दोघांचा इहपर भोग - सुखाचा ॥५॥
आत्मदेव सदा संतोषी नित्य सत्य अविनाशी ।
साक्षी सर्वांचा बहुदेशी अगम्य निर्गुणवासी ॥६॥
तुकड्यादास म्हणे भक्तांसी भेटा प्रभुरायासी ।
पावन देह करा हृषिकेशी आहे सर्वापाशी ॥७॥