येतिल गुरुराजे पहायासी निर्मळ मंदिर माझे

(चालः बाळा ! जो जो रे...)
येतिल गुरुराजे पहायासी निर्मळ मंदिर माझे ॥धृ0॥
पुष्ये वाहिन मी भावाची घालिन माळ जिवाची ।
गुरुच्या हृदयासी प्रेमाची उटि   लाविन   गंधाची ॥१॥
नंदादीप जळे भक्तीचा तार न तुटतो त्याचा ।
लागे ओलावा    ज्ञानाचा     पाझर    वैराग्याचा ॥२॥
मानस - मंदिर हे सुंदरसे द्वारी गोधन सरसे ।
शांति-क्षमा-दया अति सुरसे मोहित होती सुर-से ॥३॥
सिंहासनि रमती हृदयाच्या द्वादशकमलदलाच्या ।
वाजति चौघडिया श्रद्धेच्या सोहं ध्वनि नादाच्या ॥४॥
तुकड्यादास म्हणे नि:संगी मन हे निर्भय रंगी ।
गुरुच्या दरबारी सत - संगी    ब्रह्मानंद   अभंगी ॥५॥