क्षणभरि बोल जरा मधुसुदना !

(चाल: बाळा ! जो जो रे ...)
क्षणभरि बोल जरा मधुसुदना ! भय - हरणा भव - शमना ! ॥धृ0॥
बालक दीन अम्ही घाबरलो तव माया - भ्रमि भ्रमलो ।
न सुचे काही अता हिन झालो विषयातचि गुरफटलो ॥१॥
नच तव मार्ग दिसे प्रभुराया ! अंधारी निर्जनि या ।
जाऊ पाहू कुठे ? तुज सखया ! भेट भेट   येउनिया ॥२॥
नाना भिन्न मते लोकांची ऐकू मात कुणाची ?
सांगिल कोण मला ज्ञानाची   वाणी    उपदेशाची ? ॥३॥
निष्ठर का होसी ? निर्दयची नाहि दया तुजपाशी ।
ऐसे कोण म्हणे ? हषिकेशी ! येइल  बाध   श्रृतीसी ॥४॥
तू सर्वज्ञ हरी ! कंसारी ! मनमोहन गिरिधारी !
तुकड्यादास म्हणे सुखकारी ! अमुचे दुःख निवारी ॥५॥