अवचित आली वेळा बाई ! सद्गुरु दिसले डोळा वो
(चाल: उठा गड्या ! अरुणोदय...)
अवचित आली वेळा बाई ! सद्गुरु दिसले डोळा वो ।
काय वाणू मी रुप तयांचे ? चहु वर्णाचा गोळा बो ।।धृ०।।
सहजासनी बैसली उगी मी, एकांती निजध्यानी वो ।
झिलमिल झिलमिल रुप दाविले,जैसे मृगजळ पाणी वो ।।१॥।
रक्तवर्ण नेसुनी सोवळे, शुभ्रवर्ण अंगरखा वो ।
अंगरख्यावर चमके जैसा, श्यामवर्ण तो बुरखा वो ।।२॥।
बुरख्याच्यावर ऊर्ध्वगतीचा, सुंदरसा एक जरखा वो ।
मध्ये सदगुरुचे तेज फाकले, कोटी रवि-शशिसरिखा वो ।।३॥।
नेत्राची बाहुली फाकली, नेत्रपणा मग गेला वो।
जिकडे तिकडे सदगुरु साक्षी, दृष्टी-गोंधळ मेला वो ।।४॥।
तुकड्यादासा दासपणाचा, ठाव नुरेसा झाला वो।
_ श्रीगुरुच्य स्वकृपे मिळाला, निज-चरणाचा प्याला बो ।।५ ।।