अवघड वाट तुझी चढताना कष्ट होतसे नाना
(चाल: बाळा ! जो जो रे...)
अवघड वाट तुझी चढताना कष्ट होतसे नाना ॥धृ0॥
निशि ही अंधारी झुंजारी वाहे वात विषारी ।
न दिसे मार्ग पुढे भय भारी गर्जे पशु - ललकारी ॥१॥
सागर - पहाडांनी खोऱ्यांनी बुजला मार्ग मधूनी ।
काट्या - गोट्यांनी झरणांनी विंचू - साप - किङ्यांनी ॥२॥
लपुनी - छपुनीया चोर अति राहति मार्गावरती ।
जमले पाच - सहा बहू गणती पंचविसाची भरती ॥३॥
येऊ सांग कसा तुजपाशी ? माझी दैना ऐसी ।
तुजला कळते का हृषिकेशी ! का मग दुःख अम्हासी ? ॥४॥
तुकड्यादास म्हणे प्रभुराया ! आवर ही तव माया ।
अपुल्या ने पाया सुखवाया चोऱ्यांसी चुकवाया ॥५॥