चुकती काय कुणा भोग असे ?
( चाल : बाळा ! जो जो रे ... )
चुकती काय कुणा भोग असे ? का होता वेडेसे ? ॥धृ0॥
सांगा महाराजा हरिश्चंद्र धर्मात्मा योगींद्र ।
पाणी वाहतसे डोंबाचे नोकर होऊनि त्याचे ॥१॥
पांडव भक्त बळी शूर गडी दैवे धरली नरडी ।
फिरती वनिरानी चौफेरी असुनी साह्य मुरारी ॥२॥
संत - महंतासी योग्यासी राजे - महाराजासी I
जन्मा आल्यासी गति ऐसी लिहिली दैवी जैसी ॥३॥
तुकड्यादास म्हणे भोगावे सुख - दुख जे जे पावे I
कोणा सांगावे ? का द्यावे ? आपणची सोसावे ॥४॥