रमले मन पंढरिराज पदी

(चालः आशक मस्त फकीर हुआ...)
रमले मन पंढरिराज पदी, न सुटेचि अता हा मोह जिवा ॥धृ०॥
किती निर्मल कोमल पाउल ते, पाहताचि तनूचि सुध भुलते ।
डुलते जणु रूप विटे खुलते, फुलते, फलते उरि रंग नवा ॥१॥
कटि साजे पितांबर सुंदरसा, जरदार जसा कनकासरिसा ।
शोभे जणु कोस्तुभ चंद्र जसा, फुलला उरि मंजरि-हार नवा ।।२।l
मकराकृति कुंडल हालतसे, शिरि रत्नमुकुट वरि मोर-पिसे ।
बघताचि विटेवर ध्यान असे, मन सोडुनि दे बहिरंग हवा ॥३॥
जणु सगुणरूपे परब्रह्मचि हे, पहायास सदा जिव ये अणि ये ।
तुकड्या म्हणे वाटे सोडू नये, तमनाशक हा किति गोड दिवा ।।४।।