गुरुराज कृपाकर ठेंवुनिया
(चालः आशक मस्त फकीर हुआ....)
गुरुराज कृपाकर ठेंवुनिया, अजि ! चारितसे निजज्ञान-फळे ।।धृ०।।
सत्वगुणी करवूनि भूमी, श्रध्दा बिज पेरितसे मधुनी ।
सत्संग - जलाने ओलवुनी, तो बोध - तरुंवर लावि बळे ॥१॥
शांति-दया अति कोमलसे, फुटती तरुसी त्या पल्लव हे ।
शाखा अष्टादिक भाव जया, संलग्न अति रमताति जुळे ।।२॥
भक्ति - फुलांचा भार बहु, बहरावरि चित्त रमे भ्रमरू ।
आनंद मृदू पवनी डुलतो, सुख देत सदा तरु प्रेमबळे ॥३॥
ज्ञान-फळे अति गोड रूचे, रस सेवु मुखाविण त्या तरुचे ।
तुकड्या म्हणे घ्या रे ! ज्यास रुचे, या या पुढती, व्हा मुक्त बळे ॥४॥