चला पंढरी, पंढरी पहायासी !
(चाल : अरे हरि ! प्यालो...)
चला पंढरी, पंढरी पहायासी ! विटेवर उभा हृषिकेशी ॥धृ०॥
कटेवरि कर, कर ठेवूनिया, वाट पाहतो म्हणतो या या ।
दया ये तया, सर्व जिवाची या, कष्टतो भक्तांच्या कार्या ॥१॥
दासि जनीच्या, गोवरिया वेची, शेति राखतो सावताची ।
रसिद नेउनी, बेदरि दामाजीची, मडकी घडवित गोराची ॥२॥
सोडि वैकुंठ, वैकुंठ मूळपीठ, धरिली मृत्युलोकि वाट ।
भीवरे तिरी, वसवुनीया पेठ, उघडले दुकान चौहाट ।।३।।
खरेदी केली, पुंडलीके सारी, घेतला विकतचि गिरिधारी ।
भक्तिभावाने, काय त्याचि थोरी, आपण तरुनि दुजा तारी ॥४॥
अती आनंद, आनंद वर्णवेना, भक्त नाचति मिळुनि नाना ।
टाळ-तंबुरे, मृदंग-ध्वनि ताना, मारती रंगुनिया ध्याना ॥५॥
दास तुकड्याची, मति कुंठित झाली, पाहता विठ्ठल वनमाळी ।
बघा एकदा, येउनिया जन्मा, करा सार्थक रे ! गा नामा ॥६॥