किति सांगती, संत तुला बोध ।

(चाल : अरे हरि ! प्यालो...)
किति सांगती, संत तुला बोध । सुटेना अजुनि कामक्रोध ॥धृ०।।
काय तुज ठाव, असेल संतांचा ? अवेळी जाशिल रे ! साचा ।
शेवटी कुणी, साथ - संगतीचा नसे, कर शोध अंतरीचा ।
समज मानसी, कोण तू कवणाचा ? सु - सेवक होई संतांचा ॥
कृपा घेउनी, तोडिशि ना नाद । सुटेना अजुनि 0।।१।।
उदरि नवमास, त्रासहि सोसोनी, अचानक पडला या भुवनी ।
स्मरण ते वेळी, केले स्थिर ध्यानी, अता का होशी अभिमानी ?
जन्म पावला, झाला वयमानी, बाळपण खेळण्यास मानी ।
विषय सेविता, किति झाला बद्ध । सुटेना अजुनि 0ll२॥
पुरा मायेत, होउनिया दंग, सेविली विषयांची भांग ।
सुचेना काही, दुःखाचा रंग, धरीला  वृद्धपणी  संग ।
श्वास लागला, पुत्र म्हणे रोग ?, मांडिले बुडग्याने ढोंग ।
काढि येथुनी न तोडिशी   बंध । सुटेना   अजुनि 0।l३।l
जगी मानती, तुच्छ तुला प्राण्या !न होशी हुशार तरि शहाण्या !
मूर्ख बनतोसी, का खोट्या नाण्या, अजुनि अविनाश पाहि प्राण्या !
स्वरुप विसरला, अंतरला कान्हा,अजर अमृत रे ! निज पान्हा ।
दास तुकड्या हा, म्हणे होइ शुद्ध । सुटेना अजुनि0॥४॥