सद्धर्म कुणाचा राहो प्रभुराज तया यश देवो

(चालः कायाका पिंजरा डोले..)
सद्धर्म कुणाचा राहो प्रभुराज तया यश देवो ॥धृ0॥
कोणी असो कवण्या जातीचा ।
कोणी असो कोण्या धर्माचा ।
अंतरि निर्मळ भाव जयाचा ।
ज्यास दीन - कणवा हो प्रभुराज तया यश देवो ॥१॥
मानव हो वा हो कुणि नारी ।
सान असो वा तरुण विचारी ।
ध्यानि जपो जो तो गिरिधारी ।
ज्यास अखंडित लाहो प्रभुराज तया यश देवो ॥२॥
खळ - निंदक हे अंतरि विरले ।
पश्चात्तापे शुद्ध जाहले I
पूर्वी पाप जरी किति केले ।
शेवटि हरि - पदि धावो प्रभुराज तया यश देवो ॥३॥
जाणे जो प्रभुच्या महिमेला ।
साक्षि निरंतर त्या विमलाला ।
तुकड्यादास म्हणे तो धाला ।
निरपेक्ष जयाचा भावो प्रभुराज तया यश देवो ॥४॥