किति गोड बंसरी प्यारी मन मोहूनि ने गिरिधारी

(चाल: कायाका पिजरा खोले....)
किति गोड बंसरी प्यारी मन मोहूनि ने गिरिधारी ॥धृ0॥
जे नर संसारासी मुकले ।
विषय - सुखाच्या मार्गा चुकले ।
भेदभाव - उर्मीसी हुकले ।
थकले मोह - विकारी मन मोहूनि ने गिरिधारी ॥१॥
नरनारी किति वेडया झाल्या ।
घर सोडुनिया रानि पळाल्या ।
निजदेहाची सुधी विसरल्या ।
जडली एकचि तारी मन मोहूनि ने गिरिधारी ॥२॥
रानि पशू टवकारुनि काने ।
नाचति गोड तिच्या नादाने ।
किलबिल पक्षी करि जोराने ।
मारिती गगनि भरारी मन मोहूनि ने गिरिधारी ॥३॥
मंजुळ त्या बंसीच्या नादी ।
उपासकांचे मन आल्हादी ।
डुलती लावुनि स्वरूप - समाधी ।
तुकड्या रमत विहारी मन मोहूनि ने गिरिधारी ॥४॥