जीवन हे किमतीचे असले, काय उगा खोविसी ?
(चाल : रागे कशाला भरलिस राधे...)
जीवन हे किमतीचे असले, काय उगा खोविसी ? ।।धृ०।l
भिस्त तुझ्यावरती देशाची, वाट पाहते जनता साची ।
मौज कसा भोगशी ? कसा भोगशी , कसा0 ।।१।।
तरुणपणाचा वेळ विराचा, असाच का गेला शिवबाचा ।
लाज न वाटे कशी ? वाटे कशी, वाटे कशी ? वाटे0 ॥२।l
धर्माकरिता जे जे मेले, का ते तुज वाटे मरु गेले ?
तूच कसा पाहसी ? कसा पाहसी ? कसा 0 ॥३॥
विषयी रमोनी जे जे असती, दिसते ना त्यांची हि फजीती ।
मेली मुर्कुटे जशी, मुर्कुटे जशी, मुर्कुटे जशी ?0 ।|४|।
चल ऊठ मर्दा ! ये मैदानी, जीवन रे धर्मा अर्पूनी ।
तुकड्या म्हणे करि खुशी, म्हणे करि खुशी, म्हणे०।।५।l
जीवन जागृती १९४८