तुज काय हवे, सांग सांग यदुराया !

(चाल : उठ जागा हो का...)
तुज काय हवे, सांग सांग यदुराया ! परि दे दर्शन दीना या ॥धृo॥
बहू दिवसांचा भारति नाही आला । बघ काळ फार तो झाला ।।
गेलास कुठे, ठाव नसे कोणाला । जन म्हणती गेला गेला ।।
जे भेटाया आले सगुणा ! तुजला । त्यांना तू घेउनि बसला ।।
नच निरोप  सांगे    कोणी ।
तू येशिल कुठुनी  अजुनी ।
येण्याचे तुझिया सु - मनी ।
वाटतसे का प्रेमरुप दावाया ?। परि दे दर्शन दीना या ॥१॥
अम्हि किति केली हाक बोंब गिरिधारी ! परि कळते तुजला सारी ।।
जन स्वार्थि अम्ही पोटाचे, लोभाचे | नच कार्य पाह कोणाचे ॥
तू तसला रे नाही जनसुख धामा ! मनमोहन मेघश्यामा ! ।।
तुज अधर्म न रुचे तिळही ।
ना बघसि साधुचा छळही ।
वाहसी सदा कळकळ ही ।
मग का दिसती दोन्हि अता नेत्रा या ! परि दे दर्शन दीना या ।।२॥
निर्बल जनता हाक मारण्या झाली । मति शक्ति सर्वही गेली ।।
किति खाण्याने गळली, पडली, मेली। मरणाच्या वाटे सजली।।
ना धेर्य जरा दुष्टांना वधण्याचे । पाय ये पुढे न कुणाचे ।।
कुणि धजला रे ! जीवन गेले त्याचे । बळ नाहि संघ - संघांचे ॥
हतबल का लढण्या   येती ?
कधि गुलाम शेखी करिती ?
नच     आजवरीची   रीती ।
म्हणतात हरी ! तू बिद्र राखसि सखया ! परि दे दर्शन दीना या ॥३॥
नच वीर कुणी धजे सजे मैदानी । सांगाया दुःख-कहाणी ।।
ना अर्जुन रे हनुमंतादिक कोणी । तुज सवेचि गेले निघुनी ।।
ना वीर शिवा - तानाजी, महाराणा । आवडले ते कळाना ।
जे असती कृणी, गुंग तयांची वाणी । पाडला पेच दुष्टांनी ॥
ये काही बघु नको आता ।
करि मुक्तचि भारतमाता ।
फेड हे  कर्ज    रघुनाथा !
तुकड्यादास गमे हा जीव वाहू तव कार्या । परि दे दर्शन दीना या ।।४।।
                  जीवन जागृती १९४८