अघटीत अशी घडली घटना

( चालः जीवन में पिया तेरा साथ रहे . . . ) 
अघटीत अशी घडली घटना , 
अति लख्ख प्रकाश दिसे नयना ।। धृ० ॥ 
किती रंग अनंत उफाळित हे , 
लहरावत जणुं सुख - सागर तो । 
एकावरी वरवर चक्र दिसे 
जणु प्राण उडे   गमला   गगना ! ॥ १ ॥ 
कुणी मंजुळ वीणा वाजवितो , 
या जिवभावाला मोहवितो । 
जणु बांसरिचा प्रति येत ध्वनी , 
आदेश करी  मग    निर्भय   ना ! ॥ २ ॥ 
कुणि अमृत पान करा म्हणती ,
देउनिया धारची धार जशी । 
ही गोड रुची किति सांग तुम्हा ? 
मन उन्मन होत पिता , पल ना ! ।। ३ ।। 
षड्चक्र खडाखड जागृत हे , 
त्या कुंडलिनीसी घे खटके । 
तुकड्या म्हणे , गुरुनी वरद् दिला . 
त्या रात्रिच हा   दिसला   नयना ! ॥ ४ ॥ 
- दिल्ली , दि . ०५ - ०८ - १९६०