कोण जाणतो , कोण भासतो !
( चाल : मुझे ना भुला , मुझे ना भुला . . . )
कोण जाणतो , कोण भासतो !
कोणासाठी व्यवहार सदा चालतो ।। धृ० ।।
आमुचाची हा आनंद आम्ही भोगणार ।
भिन्न नाही माया - ब्रह्म चैतन्य साकार ।
रज्जुवरी सर्प जैसा आपणासी मानी ।
एरव्ही हे कार्य आत्मा प्रिय भोगतो ! ।। १ ।।
दुःखे मानुनिया , दुःखे कोण घेतो अंगी ?
सुख जाणोनिया , सुख कोण दुजा भोगी ?
भिन्न कोण आहे , म्हणूनि युक्तिवाद सांगी ?
सर्वसाक्षी देव , नित्यानंद पावतो ! ।। २ ।।
एक वस्तुचे प्रकार , तैसा आहे सर्वेश्वर ।
दुजा नसे नारी नर , एकाचाची अविष्कार ।
दास तुकड्याचा ऐसा , अनुभव आहे साचा ।
आपणची देव स्वर्ग , नर्क मानतो ! ॥ ३ ॥
- दिल्ली , दि . ०६ - ०८ - १९६०