सत् गुरुचे ध्यानी चित्त रंगु दे ।
( चालः गाडीवाले गाडी धीरे हाक रे . . . )
सत् गुरुचे ध्यानी चित्त रंगु दे ।
मना ! विषयासी सदा भंगु दे ! । । धृ० ॥
काम क्रोध हे शत्रु समजुनी , त्याग आपुल्यातुनी ।
मोह - मदाला थार न देई , राही सदा सद्गुणी । ।
भक्तिमार्ग हा गोड समजुनी, त्यासि अंगि रंगू दे ।। १।।
खळ - निंदक जे असतिल कोणी, दूर राहि आपुला । सत्संगाच्या सानिध्याची रुची असू दे तुला । ।
तरिच पावशील प्रभू - पदाला, वृत्ति न उल्लंघु दे ।। २ ।।
सुंदर राहणी , सुंदर पाहणी , हो सुंदर तू सदा ।
कधी कुणाच्या उगीदुगीची , घेउ नको आपदा । ।
तुकड्यादास म्हणे हे चिंतन , अंतरंगी गुंज दे । । ३ । ।
- दिल्ली , दि . ०७ - ०८ - १९६०