तुज पाहु कसा ! जीव घाबरला
( चाल : हे भजन तुझे . . . )
तुज पाहु कसा ! जीव घाबरला ।
दे दिव्य दृष्टि बघण्यास मला ॥ धृ० ॥
नयन दिपुनिया अपुरे पडती ।
तेज अतुल तव न सहे चित्ती ।
विशालता तव अथांग दीप्ति ।
डगमगे हृदयिचा धिर खचला । । दे दिव्य ।। १ ।।
कुठे नाथ तू , दीन सेवक मी ।
कुठे पूर्ण तू , पथि भाविक मी ।
तू सागर जल - अंश एक मी !
कृतकृत्य बनिन , दे वरद् मला । । दे दिव्य० ।। २ ।।
सहस्त्र - आयुध सहस्त्र कर हे !
सहस्त्र - मणिगण सहस्त्र शिर हे !
तुकड्यादास म्हणे हरिहर हे !
मज भेट - भेट मजपरी खुला । । दे दिव्य० ll ३ ll
- श्रीक्षेत्र पंढरपुर , दि . २६ - १२ - १९५१