अगं मिरा ! ऐक माझं म्हणणं काय तुला आवडला गोपाळ
अगं मिरा ! ऐक माझं म्हणणं काय तुला आवडला
गोपाळ ॥धृ0॥
उभि मिरा रंगमहालात मन हे रंगलं हरि - भजनात ।
सांगे पिता ही मात उभि का स्वस्थ अशि ग ! महालात । काय 0 ॥१॥
सोड साधुचा संग कर मिरा ! राणींचा सहवास I
नको पिता ! मज राज्य मज सुख देइल तो नंदलाल । काय 0 ॥२॥
तोड तुळसिची माळ घे मिरा ! घाली नवसर हार ।
नको मला तो हार पिता ! मी ना सोडी हरिमाळ Iकाय0 ॥३॥
शुभ्र खादी ही सोड घे मिरा ! सुंदर भरजरि शाल ।
नको मला ती शाल होतिल शेवटि तनुचे हाल । काय0 ॥४॥
सोड कृष्ण - मंदीर अग मिरा ! जाय घरी खुशियाल ।
नको मला घरदार हरि माझा इथेच निभविल काळ । काय0 ॥५॥
सोड साधुचा बोध घे मिरा ! वैभव भवसंसार ।
नको मला संसार पिता ! माझे श्रीहरि पुरविल लाड । काय0 ॥६॥
सांगे तुकड्यादास हरिचे भक्त असेचि उदास ।
आस पुरवि रघुनाथ पळतो त्यांना पाहता काळ ॥ काय0 ॥७॥