संसाराचा थाट पहा या बाईलवेड्या लोकांचा
(चालः उठा गड्या ! अरुणोदय झाला..)
संसाराचा थाट पहा या बाईलवेड्या लोकांचा ।
मालक म्हणुनी सांगे परि हा धाक वागवी लक्ष्मीचा ॥धृ0॥
फिरतो गरगर जसा भोवरा बोझ शिरावर चिंतेचा ।
शांति जरा अंतरी नसे परि दास खास हा विषयांचा ॥१ ॥
समान हक्काची स्त्री म्हणुनी दावि तमाशा हाटाचा ।
वेडि वाकडी दावी नाटके गर्व वाढवी थाटाचा ॥२॥
होति मुले मग नाच शिकविती बाळ आमुचा हौसेचा ।
बधति घरी लोकांच्या झुंडी दिवस वाटतो मौजेचा ॥३॥
निपजे मुलगा नाच्या मग तो बोल दाखवी दैवाचा I
रडे कपाळा हात लावुनी न म्हणे दोष खरा अमुचा ॥४॥
तुकड्यादास म्हणे वेडयांनो ! हाल पहा था दुनियेचा ।
बीजा ऐसी फळे निपजती घोक करा या वचनाचा ॥५॥