ऐश्वर्यांची लाट आलि तरि संतोषाला ढळवू नको
(चालः उठा गड्या ! अरुणोदय झाला...)
ऐश्वर्यांची लाट आलि तरि संतोषाला ढळवू नको ।
भिक्षेची जरि वेळ पातली तेज आपुले मळवू नको ॥धृ0॥
माफि मागण्या आला खल तरी अविचाराने देउ नको ।
कधी उलट होइल म्हणोनी वार उरावर घेउ नको ॥१॥
योग्य घ्यावया असेल तर तू थांबुनि त्याला ठेवू नको ।
वचन देउनी एक वेळ मग माघारी कधि पाहू नको ॥२॥
तोंड दिले देवाने वदण्या कठोर शब्दे बोलू नको ।
तुकड्यादास म्हणे गुरु - किल्ली वारंवारही खोलू नको ॥३॥