उठा चला मिळोनिया करु स्वधर्म - प्रार्थना
(चाल : शिंग फुकले रणी...)
उठा चला मिळोनिया करु स्वधर्म - प्रार्थना ।
जागवोनिया मना निरोप देउ बंधुना ॥धृ0॥
धर्मज्ञान आपुले कितीक नष्ट जाहले ।
भक्तिमार्ग मोडले नि मंदिराहि तोडले ॥
कोवळेपणीच ज्ञान धर्म - द्रोहि भेटले ।
वृक्ष वाढताचि बुध्दिवंत लोक भ्रष्टले ॥
जीर्ण जाहली रुढी म्हणोनि गेलि वंदना ।
आई - बाप देव - संत यासि कोणि मानिना ॥१॥
जुनेचि वस्त्र घालु खादी आपुली विणुनिया ।
स्वच्छता पवित्रता किती तरी सु - वस्त्री या ॥
तसेच अन्न खाऊ आपुले घरी दळोनिया ।
तेल शुध्द घेऊ आपुले घरी पिळोनिया ॥
कातुनी स्वतंत्र सुत काढु तेल घाणिनी ।
आपुल्या घरीच दळू मोलिबाई लावुनी ॥
तरीच सौख्य पावते आरोग्य येइ जीवना ।
कष्टि करु देह अणि सेवु रामभूषणा ॥२॥
पारतंत्र्य - वृत्ति यंत्र घेउनीच बाणली ।
आळसी जनी वृथा मिजास थोर वाढली ॥
करा घरीच यंत्र मोलि नाणता कुठोनिया ।
कामि लावुनी गरीब अन्न द्या तयासि या ॥
कितीक लोक नोकरीविनाच प्राण ठेविना ।
उद्यमास लावुनी जगात जागवू जना ॥३॥
सर्व लेकरे प्रभूस एक - पक्षि राहती ।
अम्हीच का न सर्व प्रेमि ठेवितो तशी मती ? ॥
धर्म - द्रोह जाति - द्रोह देश - द्रोह सोडूनी ।
मिळुनि गाउ राम - नाम प्रेम रंगि रंगुनी ॥
सत्येता मनी धरोनि कृष्ण गीत भूषणा I
सेवकत्व पावुनी लढू तसे रणांगणा ॥४॥
धर्म - वर्म आमुचे न खोवु देऊ कोणत्या ।
आश्रमी मठी तटीचि ज्योति ठेवु जागत्या ॥
तत्त्व - ज्ञाने शोधुनीच मार्ग जाणुनी वळू ।
पूर्वजापरीच मार्ग आपुलाहि आकळू ॥
सर्व संघटोनि एक होउनि प्रभू म्हणा ।
उणा न ठेवुची कुणा असेल ज्यास भावना ॥५॥
या पवित्र होउनी पवित्र कार्य जाणुनी ।
पवित्रताचि मानवे प्रभूसि या जनी वनी ॥
देह - द्रोह मार्ग - वर्ग सान - थोर हो कुणी ।
पवित्रतेची एक जात राहु सर्व होउनी ॥
कर्म आपुले करोनि या स्मरू प्रभू गुणा ।
दास तुकड्याची हाक घ्या जरा तरी मना ॥६॥