तुज मी गाउ कसा ?

चाल : माझा होशिल का . . . ) 
तुज मी गाउ कसा ? 
सुस्वर लावु कसा ? । । धृ० ॥ 
कोठुणि आणू मंजूळ वाणी ? 
कोण शिकवि मज तुजवाचोनी ? 
चंचल मन समजावू   कसा ? ॥ १ ॥ 
ध्यान धराया आसन लावी , 
तुज हृदयासनि जाणुनि बसवी । 
अनुभव करुनि  पाहू   कसा ? ll २ ll
नयनमनोहर रुप ते सुन्दर , 
पाहण्यासी जिवि उठतो गहिवर । 
तळमळते मन , साहू कसा ? | ॥ ३ ॥ 
तुकड्यादास म्हणे एकांती , 
भेट तरी रे ! मिळण्या शांति । 
तुजविण जगि या राहु कसा ? l। ४ ।। 
- गुरुकुंज , दि . ०३ - ०८ - १९५३