तुझेच रुपडे आजवरी मी पाहत आलो हरी !
(चाल गळ्यांत माझ्या तूंच जिवलगा..)
तुझेच रुपडे आजवरी मी पाहत आलो हरी !
का पाठवशी तोंड फिरवुनी, दगड पुजाया दुरी ? ॥ध्रु।।
वृक्ष वेलि अणि नदिकाठी मी तुज ध्यानी पूजिले ।
गंध-फुलांनी, घंटि धरोनी, कधीच ना रमविले ।।
अनुभव आला जिवास माझ्या सर्व व्यापला हरी ।
दिसेल जे जे तूच तूच रे ! हीच अनुभुती खरी ॥१॥
हृदय न जाते आजहि तिकडे, पंथ-पक्ष पाहावया ।
दिसेल जे जे सर्व प्रभु ! तू, हीच साक्ष अजुनिया ।।
तुकड्यादासा जगत् ब्रम्ह हे, विश्वासह अंतरी l
भेटण्यास मन उत्सुक असते,असत्य ना तिळभरी ।।२॥
श्रीगुरुदेव मासिक जून १९५५