तिळतीळ तूटे जिव माधवा !

(चालः बंसिका बजाना छोड़ दे..)
तिळतीळ तूटे जिव माधवा ! मन पाहतसे तव वाट ।।धृ०।।
काय कुणा सांगावे असले, होऊ नये ते सगुणा ! झाले ।
घाबरले मन जिवना भ्याले ।
अपुलेही परके पाहण्याचा, दिसतो सगळा थाट रे ।। मन 0।।१।।
कष्टही करुनी न मिळे खाया, सत्य असो न मिळे बोलाया ।
काय करा न कुणी सांगाया ।
रहा,मरा,कुणि काहि करा हे झाले सगळ्या पाठ रे ।। मन 0।।२।।
मी कोणास्तव न कळे कोणा, स्वार्थ सुखाला जो तो शहाणा ।
मानास्तव डुलवितात माना ।
का रे अशि ही वेळ पातली, कधि फिरते ही लाट रे ।। मन 0।।३॥
चिनभिन दिसते नगर बिचारे, प्रेम नसे, भयभीतचि सारे ।
काय पुढे होई न पता रे ।
तुकड्यादास म्हणे येई तुज धरिले मनाशी दाट रे ।। मन 0।।४॥