कधि वाजविशी हरि ! बांसरी ?
(चालः बन्सीका बजाना छोड़ दे...)
कधि वाजविशी हरि ! बांसरी ? मन लावितसे तव तार ।।धृ0।l
कोमल-मंजुळ न रुचे गाणे, ते तर गाउनि गेलि पुराणे ।
भुलली जनता त्या प्रेमाने ।
वीर-ध्वनिचा नाद हवा अजि,कधि तु वाजविणार रे ! ।। मन 0ll१।।
त्या बंसीने वळल्या गायी, धावुनि येती एकच ठायी ।
आज हवी तैसी जनता ही ।
दुःख न बघवे दीन-जनाचे, सगळी मारामार रे ! I। मन 0।।२।।
त्या बंसीने डुलली झाडे,सगळी कृष्ण-कृष्ण ध्वनि काढे ।
आज हवे तरुणा गुण गाढे ।
नाहीतरि ही वेळ न बरवी, झाला जिव बेजार रे ! ।। मन 0।।३।।
त्या बंसीने वळल्या गोपी, आज कशी निर्भयता व्यापी ।
लय झाल्या तुझिया संकल्पी ।
तुकड्यादास म्हणे वाजविना, दिसु दे शेवटी सार रे ! ।। मन0 ll४ll