जाऊ कसा विपरीत पथा मी ?
( चाल : आश्रम की हरिचे हे गोकुळ . . )
जाऊ कसा विपरीत पथा मी ? मिळतिल जेथे जन खल कामी ।।धृ।।
निर्मल जीवन दुर्लभ म्हणती , कळली ना मज याची महती ।
जाउनि होईल मन वेड्यापरि , कोण दुजा येउनिया सावरी ? ।
होईल हानि कशी भरविन मी ? ॥ १ ॥
समज जया नुरली ही काही पडतील जन ते भव-भय-डोही ।
सावध होई मना ! अजुनीही । ना घे पाय पुढे दुःखदायी ।
तुकड्यादास म्हणे चुकुनी मी ।। २ ।।
- पंढरपूर दि . ०२ - ०१ - १९५२