हो अंतर्मुख , बघ आत जरा

( चालः हे वंदन तुझे . . ) 
हो अंतर्मुख , बघ आत जरा, हा लखलखतो निज भानु खरा ॥ धृ०॥
सुंदर चमकत रंग मनोहर , गंगा - यमुना वाहति झरझर । 
गुंजारव करि अनहत सुखकर , बघता पडतो विसर पुरा ॥१॥ 
मना उन्मनी लागुनि राहे , जना विसरुनी आत्मप्रभा हे । 
जिकडे तिकडे दिसतचि राहे, भवबंध तरिच हे तोडि नरा ॥२॥
सार्थक याविण नाहि समज हे, अनुभवुनी घे तव हितगुज हे ।
तुकड्यादास म्हणे भजभज हे,चल जागजाग झणि करुनि त्वरा ॥३॥
       - पंढरपूर , दि . २६ - १२ - १९५५