चित्त तुझे पायी , ध्यान दुजे नाही

( चाल : सुनते थे नाम हम . . ) 
चित्त तुझे पायी , ध्यान दुजे नाही । 
नाम गावोनि हा जिवभाव रंगला ॥ धृ० ॥ 
ब्रह्म मुहर्तासि करोनि स्नान , 
आलो तुझ्या पायी धराया ध्यान । 
या प्रेमाचा मोह मना लागला,
बघता निरांजनी,तल्लीन झालो मनी । नाम गावोनी० ॥ १ ॥
दरवळला हा सुगंध स्थानी ,
वेडावले मन पुष्प बघोनी । 
मंजुळ नाद कानी ऐकला , 
पडली डोळ्या ताटी, आली दिव्य दृष्टि । नाम गावोनी ।। २ ।। 
बोध जिवाला सततचि होतो , 
अनुभव हा सर्वासचि येतो । 
सत्संगी लाभ जिवा लाभला , 
दास तुकड्या म्हणे , नाही नाही   उणे । नाम गावोनी ।। ३ ।। 
     - गुरुकुंज , दि . १५ - ११ - १९५४