स्वराज्य ऋतुचे पाणि लागता, जीर्ण झाड डोलले

(चालः धन्य धन्य गे स्फूर्ति..)
स्वराज्य ऋतुचे पाणि लागता, जीर्ण झाड डोलले ।
कसे निर्भय होउनि बोलले ।।धृ०।।
ग्रहण भंगले गुलामगिरीचे, शुध्द स्वरुप प्रगटले ।
क्रांतिचे प्रकाश फोफावले ।।
झडझड खडखड जीर्ण पत्र ती गर्जुनि गळु लागले ।
पाहता जन  हर्षित  जाहले ।।
(अंतरा) किति तातडिने हे नवपल्लव वाढती ।
आच्छादित होई भारतभूमी किती ।
अति - गर्द किती ही हिरवळ मधि शोभती ।
संघटणेचा बहार सुंदर, दिसती खुलली फुले ।
गड्या मम मन हर्षित जाहले ।।१।।
सत्य, अहिंसा, न्याय, त्याग हे खत देउनिया मुळी ।
वृक्षि या कितिदा दिधले बळी ।।
नव-वीरांची सुंदर  स्वरुपे, कुलवानांची घरे ।
जाहली  नष्टभ्रष्ट   साजिरे ।।
अगणित पैसा यात उधळला, जिवंत तरु ठेवण्या ।
लाभले भाग्य अता घरधन्या ।।
(अंतरा) जे गेले त्यांच्या जिवास शांती मिळो ।
स्वातंत्र्य लाभले त्यांना स्वर्गी कळो ।
हे टिकवुच आम्ही कधी न मन डळमळो।
स्वातंत्र्याचे उज्वल ध्वज हे, विश्व विजयी जाहले ।
ऐकता स्वर्गि वाद्य वाजले ।।२।l
सुंदर सजला वृक्ष गोड हा ! चहुबाजुनि साजिरा ।
टप - टपे बहार याचा  पुरा ।।
जिकडे-तिकडे झुंजारवती, नकली भ्रमरे किती ।
लागते मम मनि यांची भिती ।।
(अंतरा) जागवा ! जागवा ! ! त्याचे रक्षक कुणी ।
हे किडे झोंबुनी वृक्ष देति सुकवुनि ।
हे दिसता मन हे हळहळते आतुनी ।
सुराज्य राळी पसरुनि भंवती, सांभाळारे भले ।
वृक्ष हे डोळा भरू लागले ।।३।l
जळती अंतरी शत्रु कितितरी, सहन होइना तया ।
म्हणे स्वातंत्र्य नको भूमि या ।
गुंडगिरीचे सुळसुळाट त्या करिता ये ना पुन्हा ।
म्हणोनी अति चिडताती मना ।।
अबलांवरि अंत्याचाराने, टोळ-धाड आणण्या ।
मिळे मग पायबंद घालण्या ।l
(अंतरा) व्हा उभे म्हणुनी वृक्ष न तोडो कुणी ।
जावु द्या प्राण जरि गेले त्यालागुनी ।
ही दवडु नका रे ! संधि मिळाली झणी ।
तुकड्यादास म्हणे देशाचे भाग्य उदय पावले ।
पाहता मन हे  आनंदले ।।४।।