लागलं वेड काय याला ? ढोसतो आरू बैलाला

(चालः राजहंस माझा निजला...)
लागलं वेड काय याला ? ढोसतो आरू बैलाला ।।धृ०॥
हा कसला मालक झाला, ना दया जिवाची ज्याला ।
निर्दयी अशा मनुजाला, ना कळे देव  का   फळला ?
(अंतरा) ज्याचि तो कमाई खातो ।
त्यावरी    तुतारी   धरतो ।
मारतो   कसाया - सम्   तो ।
कसला  रे     शेतकरी     झाला ! ढोसतो आरू बैलाला ।।१।।
मुक्या जिवांचा वाली, म्हणतात तुला सुखशाली ।
बुध्दि कुठोनी आली, अंगात तुतारी घाली ।
कळते का ? इजा किति झाली, तुज होस कशाची आली l
बैलांचा   शाप   न   घेई ।
मग नर्क प्राप्त  निश्चयही ।
का बनसि असा अन्यायी ।
हा      कलंक    तव    कीर्तीला,   ढोसतो आरु बैलाला ।।२।।
हा शेतकर्यांचा देश, भाग्यानी तुज लाभावा ।
गोपाल-भूमि ज्या म्हणती, तुज जन्म तिथेची व्हावा ।
श्रीकृष्ण-रामसम झाले, महादेव - दत्त   ज्या   गावा ।
(अंतरा) बैलास   थोरवी   देती ।  
नंदी म्हणवुनिया   पुजिती ।
तुज का न कळे ? मूढमती ।
ज्यामुळे तु    जगल्या   गेला ! ढोसतो आरू बैलाला ! ! ।।३।।
हातचि ही फेक तुतारी, दाखवी धाक काठीनी ।
पुचकारी-पुकारी त्याला, दरडाव गोड शब्दांनी ।
कर काम आपुले काही, जाइ ना जरा उशिरानी ।
(अंतरा) बैलासी रग- रग बोले ।
मग तोच  धावुनि   चाले ।
अजवरि हे कामा  आले ।
तुकड्या म्हणे मारि कशाला ? - ढोसतो आरू बैलाला ! ।।४।।