जिवंत हृदयाच्या पुरुषा । तव पालट का होइना ?
(चाल: धन्य धन्य गे स्फूर्ति...)
जिवंत हृदयाच्या पुरुषा । तव पालट का होइना ?
धिंगाणा कसा बघवतो मना ? ॥धृo।।
पुर्वज तुजला पाहुनि म्हणतिल - मृत्यु का न ये तुला !
असा हा कलंक का लाभला ?
जन्माला आलास भारती, मातृभूमिच्या कुळी ।
व्हावया गुंडजनाचा बळी ! ॥
कसे सहन होतसे तुला हे, राक्षस शिरती घरा ।
रक्त तव का न उसळते विरा ? ।
(अंतरा) कापुनी मुलांची शिरे माळ घालती ।
कितितरी बालके अग्नीवरी भाजती ।
टोचुनी शुत्र त्या फिरवुनी भिरकाविती ।
हृदय फाटते ऐकुनि असल्या अमानुषी यातना ।
पाहुनी चीड न ये का मना ? ॥१॥
नंगा - नाच असा हा करिती, बाजारी येउनी ।
न वाली उरला का रे कुणी ?
कितितरि अबला या भीतीने, प्राण देति जाउनी ।
काय त्या म्हणतिल तुजलागुनी ?
मर्दानो लावुनी लग्न, ही केलि फजीती अशी ।
जन्मला व्यर्थ भारता - कुशी ।।
(अंतरा) का थंड तुम्ही हा बलात्कार पाहूनी ?
मरणास भिता का कोल्ह्यासम होउनी ?
आठवा मनी श्रीकृष्णार्जुन - काहणी !
व्हा अर्जुन या भारत समरी, जोर होऊ द्या दुणा ।
धिंगाणा कसा बघवतो मना ? ॥२॥
चाल, पुढे घे पाय, भिऊ नको, मरण येउ दे तुला ।
चमकशी चारित्र्याने खुला ।।
गिधाड होउनि जगण्यासाठी, राहू नको भारती ।
ऊठ चवताळ शत्रुंच्या प्रती ।
थोर-विरांच्या आदर्शापरि, यश घेउनि ये घरा ।
नाहितर प्राण तरी दे विरा ! ।।
(अंतरा) हा देश न जावो अता शत्रुच्या कुशी ।
लढण्यास तुला येउ दे स्फूर्ति अणि खुशी ।
मरशील जरी तू स्वर्गसुखा भोगशी ।
भीति बाळगू नको कुणाची, लढ जा समरांगणा ।
धिंगाणा कसा बघवतो मना ॥३॥
शूर देश हा तुझा, राम अणि कृष्ण यात जन्मले ।
शिवाजी भूषण हे जाहले ।।
महाप्रतापी हनूमान अणि भिष्मार्जुन येथले ।
लढुनिया यश घेउनि शोभले ।।
रक्षण करण्या भारत - भू चे, वाण तुवा घेतले ।
भाग्य तुज चमकाया लाभले ॥
(अंतरा) अन्याय कुणावर करु नको जाउनी ।
परि देशद्रोह्या दया न ठेवी मनी ।
होउ दे कार्य हे तुर्त बघू ह्या क्षणी ।
तुकड्यादास म्हणे देशाची, चुकवी ही यातना ।
धिंगाणा कसा बघवतो मना ।।४॥