चला उठारे तरूणांनो ! हा आळस घेउनि बसला का ?।
(चालः कृणि कृष्ण पाहिला का माझा..)
चला उठारे तरूणांनो ! हा आळस घेउनि बसला का ?।।धृ0।।
दिवस लोपला सत्कर्माचा रात्र पसरली स्वार्थाची ।
नाही का चिंता याची ? हा भार न भूवरि दिसला का ? ।।१॥
जगणे मरणे राष्ट्राकरिता, धर्म असा हा तरूणांचा ।
ना उरला काळचि याचा, हे समजुनि हृदयी रुसला का ? l।२।l
एकाला धनधान्य मिळे अणि एकाचा जिव-प्राण गरळे ।
नेत्राने पाहता सगळे, या अन्यायामधि फसला का ? l।३।l
देवाने जे रक्त दिले, जे धैर्य दिले अणि ज्ञान दिले ।
ते सगळे विषयासाठिच का ? हा प्रश्न कुणातरी पुसला का ? ।।४।
अवलांचे किति हाल असे अणि गुंडांची बेचाल असे ।
हे प्रगट होय तरि का न दिसे ? भित्र्या जिवनातरि घुसला का ? l।५।।
तुकड्यादास म्हणे घ्या हाती, अपुलाले कर्तव्य अता ।
प्रभु इच्छितसे परिवर्तनची, हा मार्ग न अजुनी दिसला का ? ॥६॥