स्वातंत्र्य - देवता आली, भारतात सुख द्यायाला

(चाल: राजहंस माझा निजला...)
स्वातंत्र्य - देवता आली, भारतात सुख द्यायाला ।।धृ०।l
भारतीय पुत्रांसाठी, माणुसकी शिकवायाला ।
गेलेले वैभव सारे धावली पुन्हा घ्यायाला ।
सत्य - न्याय- निष्ठुरतेचा, सुखमंत्र घोषवायाला ।
(अंतरा) स्थापना तियेची झाली ।
परि पूजा अजुनि न केली ।
पडदाच  टाकुनी   बसली ।
तापली, क्रोधली, ज्वाला,    लागली   बळी   घेण्याला ।।१॥
पाहते वळुनिया भवती, कोण-कोण पूजा देती ।
कोण न्याय - निष्ठूर होती, धैर्याने  पुढती  येती ।
साहित्य सजवुनी सारे, आज्ञेचे पालन  करिती ।
(अंतरा) पाहते नेत्र उघडोनी ।
परी शब्द पडेना कानी ।
ना  दिसे    पुजा    नेत्रांनी ।
वैश्वानर भडकुनि   गेला,   लागली   बळी    घेण्याला ।।२।।
स्वातंत्र्यदेवि - भक्तांनो ! विरांनो ! गुणवानांनो !
का देवी स्थापुनि दिधली, सत्याग्रहि राष्ट्रदुतांनो ?
पूजा न अजुनिया केली, रंकांनो !  श्रीमंतांनो !
(अंतरा) घ्या न्याय - खड्ग हे हाती ।
व्हा उभे समरभू-वरती ।
लावुनी जिवाची ज्योती ।
पूजू या   चला   देवीला,    लागली    बळी    घेण्याला ॥३॥
ही सर्वा भावे देवी, सर्वांचे सुख आठविते ।
सर्वास सारखे अन्न, धन, मान पाहिजे - म्हणते ।
अन्यायी कोणि नसावा याचा जप अंतरि करिते l
(अंतरा) या करा व्यवस्था सारी ।
शांतवा देवि सुखकारी ।
आळसू नकाच पुजारी ।
तुकड्या म्हणे सजवा तिजला, लागली बळी घेण्याला ।।४॥