उठ! जागा हो, का निजला रे, सखया? तव सुख सर्व हे वाया
(चाल: मनि धीर धरी शोक आवरी...)
उठ! जागा हो, का निजला रे, सखया? तव सुख सर्व हे वाया ।।धू०।|
ही झोप नव्हे, कर्मगुंगि तुज आली । मायेची झापड बसली ।
हा जन्म असा कर्म-झोपिच्या माजी । घालवुनी बनशी पाजी।
(अंतरा) तव॒ सुख मार्ग गोंधळले।
दु:खाच्या वाटे वळले ।
तुज जोवरि हे ना कळले ।
तोवरी तुझा जन्म व्यर्थ अवनी या। ही तोड भ्रमाची माया ।।१॥।
रे ! लावुनिया उपादान संकल्पी । पडला कर्माच्या श्रापी ।
विसरोनि खरे स्वरुप ब्रह्मपदाचे । का भीक मागसी वाचे ? ।
हा विषयांचा पगडा धरूनी माथा । वाचसी कर्मकुट-गाथा ।
(अंतरा) हे सुख नव्हे २ ! फाशी
बनशी मग अंती त्रासी।
येईल पुढेच फळासी।
रे शोध गड्या ! मोक्षसुखा मिळवाया । ही सोड उपाधी-छाया ।।२।
या झोपेचा प्रकाश कोठे आहे? हे साक्षी होउनि पाहे ।
तुज दिसती हे सर्व भास मायेचे । तू शोध मूळ हे त्याचे ।
ही कोण करी स्वप्न-सृष्टि भासाची ?म्हणति या अविद्या साची ।
सुख -दु:खाची जाणिव कवणा होते? तू पाहि विवेके त्याते ।
(अंतरा) हा सर्व खेळ जीवाचा ।
तू जीव नव्हे अधि त्याचा।
स्व-प्रकाश तव हा साचा ।
रे! सोडुनिया मूळ पूर्ण तत्त्वा या । का फिरसी बेडा व्हाया? ।।३।
जा पाहि अता महावाक्य वेदाचे। घेउनी अर्थ हे त्याचे ।
करि ध्यास सदा देहभान सोडोनी । मग. होशिल ब्रह्मज्ञानी ।
सत्-संगाचे मार्गी जागे झाले । ते सुख पूर्ण अनुभवले ।
(अंतरा) तव झोप सर्व अज्ञानी।
फसला विषयापासोनी ।
ही याद घेठ॒ अनुमानी ।
गुज सांगे तो तुकड्यादास जगा या । रे नाहि पुन्हा नर-काया ।।४।