येना येना, येना, येना येना रे !

(चालः भारत के बलवान जगमें...)
येना येना, येना, येना येना रे !
मोहना ! येना येना रे ! ।।
वाट न बघता येना, येउनि बघ ही अमुची दैना,
अपुले वचन पुरविना रे !
राघवा ! का नच करुणा रे ?।।धृ0।।
विश्वासुनिया तुझ्यावरी । बसवुनि मूर्ति घरोघरी ।
करिती पूजा    नरनारी,  का    हाक   घेईना   रे ! ।।१।।
धान्य नसे बाजरी तुरी । सावकार मागति जबरी ।
चिलेपिले रडतात घरी,  हे    सहन    होइना   रे ! ।।२।।
गुंड धेंड डोकी चढती। अबलांचे या हाल अती ।
भरदिवसा कापिती, तू अपुले चक्र  उचलना   रे ! ।।३।।
तरुण मुळी हतबल झाला। बाहू न शसत्रहि धरण्याला ।
कुठला तीर अणि भाला, तू नजर   फिरवना   रे ! ।।४।।
तव कार्या लागलो अम्ही। ये धावत पड़ू न दे कमी ।
तुकड्यादास म्हणे आठवुनी, निज अभिवचना रे ! ॥५॥