सोड सोड बा भारत वर्षा ! चाल जुनी आपुली

(चालः पटापटाला फोडूनि आलिम...)
सोड सोड बा भारत वर्षा ! चाल जुनी आपुली,
निरिक्षुनि पुढे वाट धर भली ।।धृ०॥
वर्म नसे तो धर्म समजशी, जशी रुढी चालली,
जनातुनि वाहत आली खुली ।
समाजकार्यी लक्ष न देता, जीर्ण पोथि लाविली,
बिघडली चालरीत सेविली ।
(अंतरा)
बा ! उघड नेत्र, बघ राष्ट्र झोपले कसे ।
ना धीर,धमक,प्रेम,शील कुजले जसे ।
लावुनी नेत्र पण देव   देव  म्हणतसे ।
नको अता ही निर्बल निष्ठा, कर्तव्ये कर बली ।
निरिक्षुनि पुढे वाट धर भली ॥१॥
दैव दैव म्हणुनि काय रडशी ? जळता घर आपुले,
वाहसी पाषाणावरी फुले ।
अश्रु सिंचुनी आग विझेना, राष्ट्रचि हे भडकले,
विषमता - विषे भस्म जाहले ।
स्मशानात या सुखशांतीचा, बाग कशाने फुले ?
विचारुनि फेक पुढे पाउले ।
(अंतरा)
रे ! कर्तव्याचे तेज जगा दावुनि ।
बलिवेदीवर निज शिरकमले वाहनी ।
करि प्रसन्न आता राष्ट्रदेवते मनी ।
तुकड्यादास म्हणे पसरू दे, रामराज्य भूतली ।
निरिक्षुनि पुढे वाट धर भली ॥२।।