सुखी कशाचा ! जखडलास तु चारि बाजुनी पुरा

(चाल: धन्य धन्य ग स्फूर्ति तन्मये... )
सुखी कशाचा ! जखडलास तु चारि बाजुनी पुरा,
पहा तर उघडुनि डोळे जरा ।।धृ०।।
म्हणतचि होतो, लहान असता कीड लागली तुला ।
रोग हा पुढे पुढे वाढला ।।
स्पष्ट उमटला, दिसू लागला, हो सावध तरि मुला।
सांग चालकास करण्या भला ।।
महाप्रबल हा राष्ट्ररोग, जरि पूर्णपणे वाढला ।
घात होण्यातच फळतो खुला ।।
प्रार्थना असे चालका ! पालका ! तुला ।
या अर्धगलीत बालकास उचलुनि भला ।
नवतेज मिरवि, या सांभाळी चांगला ।
जबाबदारी घेउनि असली, मारुनि घेशी सुरा ।
गमविशी  स्वातंत्र्याचा  हिरा ॥१॥
कोण तुझ्या रक्षणास येतील ? निरक्षुनी घे अता ।
लावुनी पणास, बुध्दीमता ।।
मित्र कोण अणि शत्रु कोण, हे ओळखुनी पथ धरी ।
करी हे तातडीने चल करी ॥
चुकतची गेला प्रयोग सगळा, घातचि दिसतो पुढे
संकटे का येती चहुकडे ? ।।
मज एकचि उत्तर आठवते या स्थळी ।
चारित्र्य खोवले, इमान नुरले मुळी ।
स्वार्थाध तुझे हे साथी दिसती बळी ।
कर कर पश्चाताप ! सुधर तरि प्रार्थुनिया ईश्वरा ।
ऊठ भारता ! करोनी  त्वरा ।।२।।
पुण्य तुझ्या बहु पूर्वजाचिये, म्हणूनि टिकला तरी ।
नाहितर गती न होती बरी ।।
अजुनि तरी घे आशिर्वादा पाय पुढे चल धरी ।
धीर धर, जरा न मुळी घाबरी ।
सर्व देव आणि सर्व संत हे, बघती बसुनी वरी ।
जाग रे जाग भारता ! त्वरी ।।
या स्वातंत्र्याचे दीप उजळण्या तुला ।
सुविचार सुचू दे, मिटवुनि हा गलबला ।
हे पक्ष पंथ जाऊ दे लया, हो खुला ।
तुकड्यादास म्हणे सुख लाभो, पुढे तरी घर-घरा ।
देश हा   गौरवु   दे   साजिरा ॥३॥